विटा येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक; धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी प्रभावी नियोजनाचे आवाहन
सांगली : महायुतीचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटा येथे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. आगामी निवडणुकीत त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
महायुती सरकारने राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा विश्वास आगामी निवडणुकीत विजयाच्या रूपाने व्यक्त होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींसोबत समन्वय तसेच महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रभावी कामकाजावर सविस्तर चर्चा झाली. महायुतीची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास यांच्या बळावर धैर्यशीलदादा कदम यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
या प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, माजी आमदार सदाशिवराव पाटील, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, शरद लाड, वैभव पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.