पालकमंत्र्यांच्या ‘नागरिक संवाद’ उपक्रमातून जनतेच्या आशेला मिळाला शासनाचा दिलासा
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित ‘नागरिक संवाद’ कार्यक्रमाने शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी केले. यामुळे सामान्य जनतेच्या अडचणींना संवेदनशीलतेने प्रतिसाद देणारे व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने आज अनेकांच्या अपेक्षांना नवी आशा मिळाली.
शासनाची प्रत्येक योजना आणि सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असून, तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळे या योजना गरजूपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून, त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने काम करून प्रत्येक प्रकरणाला न्याय द्यावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या संवाद कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ड़ॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आत्मीयतेने आणि संवेदनशीलतेने ऐकून घेतले. प्रलंबित असलेले प्रश्न, शासकीय प्रक्रियेतील अडचणी आणि विविध विभागांशी संबंधित गाऱ्हाणी नागरिकांनी मांडली. प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळत आहे. या कामांच्या पूर्ततेचा अहवाल पालकमंत्री कार्यालयास व संबंधितास 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश देऊन त्याचा आढावा पुढील नागरिक संवाद कार्यक्रमात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केला. नागरिकांमध्ये शासन-प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ होण्यासाठी हे एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
यावेळी जवळपास 100 हून अधिक तक्रारीवजा निवेदने प्राप्त झाली असून, ती संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात येत आहेत. कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, नगरविकास आदि विभागांशी संबंधित गाऱ्हाणे पालकमंत्र्यांसमोर मांडले. प्रत्येक तक्रार बारकाईने ऐकून पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ माहिती घेत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शासकीय कामकाजासंबंधी नागरिक संवाद कार्यक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही सुरू झाली. यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला.
कार्यक्रमास विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.