मिरजेत ‘पालकमंत्री सेवा सुविधा केंद्रा’चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांना शासकीय सेवा एकाच छताखाली मिळणार
सांगली : मिरजेतील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि नागरी सुविधा अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तांदूळ मार्केट येथे जीएमओ (GMO) कार्यालयाअंतर्गत ‘पालकमंत्री सेवा सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या नूतन केंद्राचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मिरजेतील जनतेला शासकीय कामांसाठी विविध कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, म्हणून हे ‘पालकमंत्री सेवा सुविधा केंद्र’ सुरू करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी एकाच ठिकाणी योग्य मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. यामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची आणि श्रमांची मोठी बचत होईल, असा मला दृढ विश्वास आहे.
याच सोहळ्याचे औचित्य साधून मिरज महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या धडाडीच्या नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंत्री पाटील यांनी नमूद केले की, जनतेशी सातत्याने थेट संपर्क ठेवत त्यांच्या स्थानिक समस्या तातडीने आणि तत्परतेने सोडविण्यासाठी हे संपर्क कार्यालय एक निश्चितच प्रभावी माध्यम ठरेल, असे पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी गटनेते संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, मोहन वाटवे, भाजपा नेते सुरेशबापू आवटी, पांडुरंग कोरे, विवेक उर्फ बंडू शेटे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.