उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शनिवारी कोल्हापूर येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत, गोकुळची निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ या नावाने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच, महायुतीची ताकद, समन्वय आणि विकासाचा दृष्टिकोन याच्या बळावर ही निवडणूक यशस्वीपणे लढवू, असा विश्वास देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण सुचना दिल्या तसेच प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकत्र यावे आणि गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आत्तापासूनच जोमाने कामाला लागावे,असे आवाहन केले.
या बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम तसेच महायुतीचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.