सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप सज्ज; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक संपन्न
सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार आहे.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती, जागांचे वाटप आणि प्रचाराची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात महायुतीला दणदणीत विजय मिळवून देण्यासाठी पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आवश्यक धोरणात्मक सूचना व महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
या बैठकीस मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, तसेच आमदार अतुलबाबा भोसले, मनोज घोरपडे, महेश शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सत्यजीत देशमुख यांच्यासह पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.