कागल नगरीत विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका महापौर रूपराणी निकम, राजे समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, मोफत शिक्षण सुरू केले, वंचितांसाठी विविध आनुषंगिक योजना राबवल्या आणि अस्पृश्यतेला गुन्हा मानून त्यावर बंदी घातली, असे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अविष्कार असून, त्यांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांमुळे आजही जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.