विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईतील विधानभवन येथे विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील आणि आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले. जनतेच्या विश्वासातून मिळालेली ही नवीन जबाबदारी हे दोन्ही आमदार अत्यंत समर्पण, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांनी मुंबई येथील मंत्री पाटील यांच्या ‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आमदार राऊत यांचे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आणि विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी ग्वाही देखील मंत्री महोदयांनी यावेळी दिली.