जत येथील दुर्घटना: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज सिव्हिल रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; उपचारांचा घेतला आढावा
सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी येथील मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान अवकाळी पावसामुळे भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेतील काही जखमींवर मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून,आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच उपस्थित डॉक्टरांकडून उपचारांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पाटील म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी कुटुंबियांना दिली.
याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रकाश गुरव आदी उपस्थित होते.