मरगुबाईतील घटनास्थळी मदतकार्य सुरू… जखमींना तातडीने योग्य उपचार उपलब्ध करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

8

सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान भागात भिंत कोसळल्याने ६ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ पुरुष, त्यात दोन १४-१५ वयोगटातली मुलं आणि २ महिलांचा समावेश आहे. यातील काही जत तालुक्यातलेच तर काही कर्नाटकमधून मरगुबाई देवीच्या जत्रेसाठी आलेले भाविक होते. भिंत कोसळून झालेल्या या अपघातात जखमी झालेल्या १३ जणांवर वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सिनर्जी हॉस्पिटल तसेच जत, संख आणि विजापूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

सायंकाळच्या सुमारास अचानक प्रचंड वेगवान वारे सुरू झाले. त्यापासून बचाव करण्यासाठी हे भाविक भिंतीच्या कडेला जाऊन थांबले होते. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंदिराच्या शेजारील पत्र्याच्या शेडचे पत्रे उखडले गेले. हे पत्रे भिंतीवर धडकले. त्यांच्या जोरदार धडकेमुळे भिंत ढासळली आणि क्षणार्धात भिंतीच्या आधाराने उभ्या राहिलेल्या भाविकांवर पडली.

घटनास्थळी मदतकार्य तातडीने सुरू केले असून जखमींना तातडीने योग्य उपचार उपलब्ध करून देण्याबाबत सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात असून आवश्यक मदत आणि जखमींवरील उपचारांवर पाटील लक्ष ठेवून आहेत. या अपघातात बळी पडलेल्यांना पाटील यांनी आदरांजली वाहिली असून, जखमी लवकरात लवकर बरे होवोत, हीच अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.