सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव

पिंपरी: महिला सक्षमीकरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, वृक्षारोपण मोहीम यांसारख्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या देवा फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका तथा सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्के यांना पीसीएसी स्टार अवार्ड २०२१ आणि द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री रुपाली भोसले, बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांच्या हस्ते पुण्यातील मानाचा नारीशक्ती पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यामुळे, योगिता मस्के पिंपरी चिंचवड परिसरातील एक उर्जाक्षम, धाडसी आणि सकारात्मक व्यक्तिमत्व असल्याचे चर्चीले जात आहे.

कुटुंब, नोकरी किंवा व्यवसाय या वर्तुळाच्या बाहेर जाऊन समाजसेवेचे काम करणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. योगिता मस्के यांनी एमएस्सी, एमबीए असे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याबरोबर क्रीडा क्षेत्रामध्येही विशेष प्राविण्य मिळवलं आहे. शिवाय, घोड सवार सोबतच ट्रॅक्टर, मोटारसायकल असे कोणतेही वाहन त्या सफाईतदार पणे चालवतात. विद्यालयाच्या प्राचार्य ,कॉर्पोरेट क्षेत्रात, यशदा या प्रशिक्षण शिखर संस्थेत प्रकल्प अधिकारी आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ह्या वैश्विक विकास कार्यक्रमातून महिला रोजगाराच्या प्रकल्पावर काम केले असून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत. या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांना त्यांची समाजसेवेची तळमळ पूर्ण करता यावी यासाठी त्यांनी देवा फाउंडेशन नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली. अगदी कमी वयात संस्थात्मक आणि वैयक्तिक पातळीवर समाजकार्याची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आहे.

योगिता मस्के म्हणाल्या की, समाजसेवा हे व्रत एकदा प्रामाणिकपणे स्वीकारले की त्यात कायम पुढे जायचे असते. समाजातील अनेक प्रश्न जटिल झाले असून जो पर्यंत समाजातील प्रत्येक घटक पुढे सरसावणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज पुढे जाणार नाही. आपले अस्तित्व आणि कामकाज दाखवण्यासाठी फक्त महिला संघ आवश्यक आहे, असे नसून एक महिला स्वबळावर सुद्धा पुढे येऊन समाजकार्य करू शकते, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्याबद्दल कौतुक उदगार काढताना म्हटले की, खूप प्रामाणिक आणि निर्मळ मनाची असून तू खूप छान काम करतेस. योगिता मस्के या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या विषयात सुद्धा काम करतात. देवा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यानी आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षणाचे द्वार उघडून दिले हे निश्चितच कौतुकास्पद आहे.