स्वत:चे हॉटेल पोलिसांसाठी उपलब्ध करून देणारा ‘ उपमहापौर ‘
पिंपरी :करोना विरोधातील पोलिसांच्या लढ्याला बळ देण्याच्या उद्देशाने तसेच माणुसकीच्या नात्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपले तारांकित हॉटेल पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी तसेच त्यांना राहण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. हिंगे यांनी घेतलेल्या हा निर्णय पोलीस कर्मचारी, अधिकारी व पालिका प्रशासनाला दिलासा देणारा ठरला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन उपमहापौर या नात्याने तुषार हिंगे यांचा करोना विरोधातील लढा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आता त्यांनी स्वत:चे थरमॅक्स चौकातील ग्लोरी पंजाब रसोई हे हॉटेल विना मोबदला पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी अथवा त्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी व अधिकारी अहोरात्र रस्त्यावर कार्यरत आहेत.
पोलीस कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर राहून कर्तव्य बजावित असताना त्यांचा अनेकांशी संपर्क येत आहे. सदरचे कर्मचारी अथवा अधिकारी घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना वेगळे राहण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेऊन हिंगे यांनी पोलिसांसाठी हॉटेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रशासन आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच जागेची कमतरता आहे. तर आपल्या परिसरात रुग्ण अथवा संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी संबंधित परिसरातील नागरिकांचा विरोध होतो. त्यामुळे सोय कोठे करायची? असा प्रश्न निर्माण होत आहे. हिंगे यांनी स्वत: पुढाकार घेऊन हॉटेल उपलब्ध करून दिल्यामुळे प्रशासनाची चिंता मिटणार आहे.
मी पोलिसाचा मुलगा आहे. सध्या पोलीस अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने करोना विरोधातील लढाई लढत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मानवतेच्या दृष्टीने पोलिसांच्या आरोग्याचा विचार करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. पोलिसांच्या लढ्यात आपलाही छोटासा हातभार लागावा, म्हणून हॉटेल उपलब्ध करून देण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.