लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ, महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला पुकारला महाराष्ट्र बंद
मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष उर्फ मोनू गेला होता. यावेळी आशिषच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आणि आंदोलनकर्ते शेतकरी समोरासमोर आले. ज्यानंतर मोनूच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत लखीमपूरमधली घटना दुर्दैवी आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी तेनी गावात बनवीरमध्ये उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर ताबा मिळवत कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले असताना याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.