अजित पवारांसह बहिणींच्या कारखान्यांवरही आयकर विभागाची छापेमारी
पुणे: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना किरीट सोमय्यांनी ‘चॅलेंज’ केले होते. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते. कारण त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचा छापेमारी झाल्याची बातमी समोर येतेय. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्यासह आंबालिका शुगर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा मारला आहे.
त्यातील एक आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी या कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना देखील आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे. वीरधवल जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. मात्र अजित पवारांचा या कारखान्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकरणी आता अजित पवारांनी देखील पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आयकर विभागाने कुणावर छापा मारावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणावर शंका आल्यास ते छापेमारी करु शकतात. आज माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.’
‘मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने कुठलाही कर चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा हे सगळं मला व्यवस्थित माहित आहे. माझ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. मात्र, तरी देखील ही धाड तरीही राजकीय हेतूने टाकली का हे आयकर विभागालाच माहिती असेल.’ ‘आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापा मारला याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते म्हणजे माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर देखील छापे मारण्यात आले. त्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झालेली आहेत. त्यातील एक बहीण कोल्हापूर आणि दोन पुण्यातील आहेत.’
‘त्यांच्या कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या. आता यामागचं मला कारण माहिती नाही. त्या आपलं जीवन व्यवस्थित आपलं जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झालेली आहेत, नातवंडं आहेत. पण फक्त अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागाने धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा विचार करावा. कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे देखील जनतेनं पाहावं.’