…अन् महाराष्ट्राने भाजपाला ठरवलं येडी! शरद पवार म्हणतात….
सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि बहिणींच्या मालमत्तांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. आयकर बहिणीच्या घरी पडलेल्या धाडींबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान ‘बॅटिंग’ केली. म्हणालेत ‘काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, या पाहुण्यांची आम्हाला अजिबात चिंता वाटत नाही.’
शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले. निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.
शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर निशाणा
‘ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची शेतकरी आणि शेतीबद्दलची भूमिका काय आहे? त्यांना शेतकऱ्याची आस्था नाही. काही प्रश्नांसाठी उत्तर प्रदेशातील लखीमपूरला लोक रस्त्यावर आले. कोण आले रस्त्यावर, तर शेतकरी! कशासाठी रस्त्यावर आले? तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे उत्तर प्रदेशातील भाजपचं सरकार दुर्लक्ष करतंय. म्हणून निदर्शन करण्यासाठी आले होते. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या. आठ लोक मृत्यूमुखी पडले’, असं पवार म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीस दिली. मरण पावलेल्यांमध्ये एक पत्रकार होता. दोन सामान्य माणसं होती आणि पाच ते सहा शेतकरी होते. त्यांची माहिती आता सर्वोच्च न्यायालयाने मागितली आहे. पण हातात सत्ता दिली, ती लोकांचं भलं करण्यासाठी, याचं विस्मरण भाजपला पडलं आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून हत्या करण्याचं पाप केलं’, अशी टीका शरद पवार यांनी केली.