धक्कादायक: पुण्यात डोक्यात फरशी टाकून तरुणाची निर्घृण हत्या

पुणे: ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात हत्येची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. बाळू पारधी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंचर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मंचर घोडेगाव रस्त्यावर हा खून करण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांनी बाळू पारधी या तरुणाला काठीने मारहाण केली आणि डोक्यात फरशी टाकून त्याचा निर्घृण खून केला.

मयत तरुण हा आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथील रहिवासी आहे. मात्र त्याच्या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मंचर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याची घटना ताजी असतानाचा, हडपसर येथे MPSC च्या क्लासला जाणार्‍या 26 वर्षीय विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची घटना काल समोर आली होती. पुणे जिल्हाला गृहमंत्री पद असताना सुद्धा पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रणाण कमी होताना दिसत नाही. तसेच या घटनेंने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्हे निर्माण होताना दिसत आहे.