दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जयंत पाटलांकडून मराठवाड्याला अनोखं ‘गिफ्ट’
मुंबई: गोदावरी खोऱ्यात १९७५ च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकुण (६० + ६१.२९ = १२१.२९) टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी जसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.
मराठवाड्याला १९.२९ टीएमसी पाण्याची वापर करण्याची मंजूरी दिली आहे. याचा अर्थ पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. त्यातील काही प्रकल्प तिथे पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत आणि याचे सर्व श्रेय मराठवाड्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला देईल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता देण्याचा निर्णय दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घेण्यात आला आहे. #महाविकासआघाडी सरकारच्या जलसंपदा विभागाने पूर्वीच्या मंजूर पाणी वापरातील त्रुटी आता दूर केल्या आहेत. मध्य मराठवाड्यासाठी ही बाब अतिशय सुखद आहे. pic.twitter.com/hi0xtpmtQB
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 15, 2021
दरम्यान, मागच्या कालखंडात मंत्री जयंत पाटील यांनी या भागात दौरा करत या भागातील प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत असल्याचे हे चित्र आहे.