संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काल दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

बॅक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असे म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला. सतीश सावंत ज्यांच्या नेतृत्वाखाली बॅकेत काम करत होते ते काय काय काम सांगत होते, हे सर्वांनाच माहिती आहे, असे पवार म्हणाले.

आपल्या विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. कोणाच्याही दबावात येऊ नका. तसेच दादागिरी दहशतीला घाबरू नका, अशा शब्दात अजितदादांनी राणेंना खडेबोल सुनावले. बँकेला उंच स्तरावर नेणाऱ्या व्यक्तींनाच निवडून आणा. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. प्रतिभावान व्यक्तीच्या हातातच बॅक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असेही अजित पवार म्हणाले.

गेल्या आठवड्यात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारची राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असे वक्तव्य राऊत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन , सतेज पाटील यांनी केले.