पेपर फुटी प्रकरण: आरोग्य भरतीचे पेपर मंगल कार्यालयात वाटले, भाजप नेते संजय सानपच्या राजकीय कनेक्शन

8

मुंबई: पुणे पोलिसांकडून आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड भरती परीक्षेतील गैरप्रकाराचा शोध सुरु आहे. पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या बीडच्या भाजप नेते संजय शाहुराव सानप याला अटक केलीय. बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

यामुळं आरोग्य विभाग भरती परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी मराठवाड्यातील आरोपींची संख्या वाढलीय. संजय सानप हा भाजयुमोचा माजी पदाधिकारी आणि विद्यमान उपसरपंच असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले यानं परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर पेपर फोडला होता. या पेपरचं वाटप संजय सानप यानं बीड मधल्या एका मंगलकार्यालयात वाटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय सानप यानं पेपर फोडण्याच्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 ते दीड लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. एक पेपर शंभर ते दीडशे जणांना देण्यात आल्याची माहिती आहे. संजय सानपच्या अटकेनिमित्त आरोग्य विभाग भरती परीक्षेतील रॅकेट उच्च स्तरीय अधिकाऱ्यांपासून ग्रामीण भागात पसरल्याची धक्कादायक बाब या निमित्तानं समोर आली आहे.

आरोग्य सेवा गट ड परीक्षेत गैरव्यवहार करण्यात आल्याच्या आरोपात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आलीय. तर, संजय सानप याचे तीन भाऊ आरोग्य विभागात नोकरीला असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबद्दल अटकेत असलेला राजेंद्र सानप आणि संजय सानप हे दोघे एकाच गावचे असल्याचंही समोर आलंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.