‘गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी तब्बल इतकी रक्कम’
नाशिक: सिन्नरमधल्या सरदवाडीत एक धक्कादायक पद्धतीने केलेली चोरी उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी चक्क गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून एटीएममधून रक्कम पळवली आहे. चोरट्यांनी एकूण 22 लाख 71 हजार 300 रुपयांची चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या धाडसी चोरीबाबतची माहिती अशी की, सिन्नरमधल्या सरदवाडी येथे हॉटेल अजिंक्यताराजवळ अॅक्सिस बँकचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीमची फोडी केली. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. आपण कुणाच्याही जाळ्यात सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे केबल कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी डाव साधला. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले.
दसऱ्यादिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तिथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर करून पाहिले. तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार, सोमनाथ तांबे, संतोष मुटुकुळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.