मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही; छजन भुजबळ म्हणतात…
नाशिक: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना नैराश्य आले आहे. त्यांना केवळ मुख्यमंत्रीपद हवे होते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे म्हणाले होते पण स्वत: झाले. इतर नेत्यांना बाहेर का पडावं लागलं? असा प्रश्न करत करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर छगन भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो. मी शिवसेना सोडल्यावर स्वतः बाळासाहेब सुद्धा हेच म्हणायचे. मात्र मला त्याची खंत नाही. ओबीसीच्या राजकारणामुळे मला शिवसेना सोडावी लागली. मला काँग्रेससह इतर पक्षांकडून ऑफर होती, आमच्या पक्षात आल्यास मुख्यमंत्री करतो अशी ऑफरही देण्यात आली होती, असे भुजबळ म्हणाले.
परंतु मी पवार साहेबांसोबत गेलो. त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांना कोणी विचारत नाही. परंतु लोकांचं मला भरपूर प्रेम मिळतं. फडणवीस हे क्लीन चिट मास्टर आहेत. हा अवगुण आहे असं मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही, असा उपरोधिक टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.