ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय? – नवाब मलिक

मुंबई: ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई करण्यात येत आहे ती ठरवून केली जात आहे. एनसीबी ठरवून खोट्या केसेस करत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई ही बनावट होती, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत वानखेडे यांनी करण्यात आलेल्या पंचनाम्याची माहिती द्यावी, असे प्रति आव्हान मलिक यांनी दिले. तसेच एनसीबीने फ्लेचर पटेलसोबत लेडी डॉन कोण आहे, याचा खुलासाही त्यांनी करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीला घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.

याआधी मलिक यांनी के. पी. गोसावी, मनिष भानुशाली कसे एनसीबी ल मदत करतात आणि कार्यालयात येतात याबाबत खुलासा केला होता. दरम्यान, एनसीबीच्या स्वतंत्र पंचाबाबत बोलत आहेत. परंतु फ्लेचर पटेल कोण आहेत ? वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत काय संबंध आहेत ? प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. ज्या ठिकाणी घटना घडते, तिथला प्रतिष्ठित नागरिक आणि तिथल्या नागरिकांना पंचनामा म्हणून नियमानुसार करायला पाहिजे. एनसीबीने तीन केसेसमध्ये, यामध्ये स्वतंत्र पंचाबाबत माहिती घेतली असता एकच पंचनामा केल्याचे दिसत आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला.