अत्यंत दुःखद घटना: गार्डनमध्ये खेळता-खेळता खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

मुंबई: मुंबईत अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. ही दोन्ही मुलं गार्डनमध्ये खेळत असताना शेजारी खोदण्यात आलेल्या खड्डयात ते पडले आणि त्यानंतर बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय यशकुमार आणि 9 वर्षीय शिवम हे दोघेही सोमवारी (25 ऑक्टोबर) अँटॉप हिल परिसरातील गार्डनमध्ये खेळत होते. त्याच भागात पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. खेळता-खेळता शिवम आणि यशकुमार हे दोघेही त्या खड्ड्यात पडले.

खड्डा हा खोल आणि पाण्याने भरलेला असल्याने दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. अँटॉप हिल परिसरात पाईपलाईनच्या दुरुस्तीकरीता खोदकाम चालू आहे. त्या खड्डयात मोठ्या प्रणामात पाणी पाचले आहे. या खड्ड्याच्या शेजारी कुठल्याही प्रकारचं बॅरेकेड्स लावण्यात आलेले नाही,  त्यामुळेच या दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे असा आरोप मृत मुलांच्या पालकांनी केला आहे.

दोन्ही मुलं खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही मुलांना खड्ड्यातून बाहर काढण्यात आले आणि त्यानंतर सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मृत मुलांच्या पालकांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली आहे.

Read Also :