राज्य सरकारचा निर्णय; मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या 9 ने वाढवली

मुंबई: मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या सन २००१च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे निश्चित केली आहे. २०११च्या जनगणनेनंतरही निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली होती.
लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.
दरम्यान, याआधी २७ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगरपालिका सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकेच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ होणार आहे.
राज्यातील सन २०११च्या जनगणनेची आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील शहर भागातील लोकसंख्या कमी झाली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा आधार घेऊन नवीन नऊ वॉर्ड तयार केले जाण्याची शक्यता आहे. या वाढीव वॉर्डमुळे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या नगरसेवक होण्याच्या इच्छेस धुमारे फुटणार आहेत.