मोठी बातमी: मुंबईतील ऑटोमोबाईल कंपनीला भीषण आग

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा भीषण आगीची घटना समोर आली आहे. पवई परिसरातील साकी विहार रोडवरील एका सर्विस सेंटरला भीषण आग लागली आहे. पवईतील साई ह्युंडाई कंपनीच्या सर्विस सेंटरलमध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

या आगीमुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीच्या ठिकाणाहून मोठ्या स्फोटांचेही आवाज येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या आगीत सर्विस सेंटरमधील कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग सर्विस सेंटरमध्ये पसरली असून काही लोकं याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ही आग इतकी भीषण आहे की, परिसरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहे. धुराचे हे लोट २० ते ३० फूट उंचावर पसरत आहेत. या आगीच्या घटनेमुळे परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागल्याने मदत कार्यात उशीर होत आहे.