नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट; ‘स्पेशल २६’ ची घोषणा करणार

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा करणार असल्याचे ट्विट केले आहे. लवकरच मी स्पेशल २६ ची घोषणा करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन ट्विट केले आहेत. त्यामध्ये एक ट्विट स्पेशल २६ बाबतचे आहे. तर दुसरे टच्विट हे एका बेनामी पत्राबाबतचे आहे.

एका एनसीबी अधिकाऱ्याकडून मिळालेल्या बेनामी पत्रातील माहिती जाहीर करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ट्विटरवर याबाबतची घोषणा करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळपासून एकुण चार ट्विट केले आहेत. त्यामध्ये एका ट्विटमध्ये त्यांनी शायरीचा उल्लेखही केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्विट शेअर करत खरा फर्जीवाडा इथूनच सुरू झाल्याचे म्हटले होते. त्यावर वानखेडे यांनी आपण या प्रकरणात कोर्टात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. पण त्यांच्या याचिकेवर कोणताही तत्काळ दिलासा देण्यासाठी कोर्टाने नकार देत, ही याचिका फेटाळून लावण्यात आली. आज सकाळी नवाब मलिक यांनी एका नव्या ट्विटमध्ये स्पेशल २६ ची घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यासोबतच एनसीबीच्या एका बेनामी पत्राचाही गौप्यस्फोट करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांना एका एनसीबी अधिकाऱ्याने बेनामी पत्र लिहित त्या पत्रात दिलेल्या माहितीचा वापर हा तपासात करावा अशी विनंती केली आहे. चार पानी पत्रामध्ये काही गोष्टींचा उलगडा करतानाच समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी व्हावी असेही त्या बेनामी पत्रामध्ये म्हटले आहे.

Read Also :