मोठी बातमी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
अनिल देशमुख हे सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. साधारण दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या अनिल देशमुख यांची रात्री साडेबारा वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीदरम्यान अनिल देशमुख हे सहकार्य करत नसल्याचा दावा करत ईडीने त्यांना अटक केली. आता ईडी अनिल देशमुख यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना आज न्यायालयात हजर करणार आहे.
दरम्यान, ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन काही माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘हायकोर्टाच्या आदेशानुसार मी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होत आहे आणि मी माझ्या वकिलांसोबत ईडीसमोर हजर राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीच्या अधिकार्यांनी या वर्षी जूनमध्ये अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अटक केली होती.
नेमकं प्रकरण काय?
ईडीचा अनिल देशमुखांविरोधात असा आरोप आहे की, तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने काही हॉटेल मालकांकडून 4.3 कोटी रुपये उकळले होते. जे नंतर त्याने देशमुखांच्या सहाय्यकांना दिले होते. यानंतर दिल्लीस्थित शेल कंपनीच्या माध्यमातून हेच पैसे नागपूरमधील देशमुख आणि कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्या शैक्षणिक ट्रस्टला देण्यात आले होते.
ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्यामार्फत देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसूलीचे जे आरोप करण्यात आले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Read Also :
-
नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज – प्रवीण दरेकर
-
दगड आमच्याही हातात असू शकतात हे कुणी विसरु नये; संजय राऊत यांचा सूचक इशारा
-
ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलच्या दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 115 रुपये पार
-
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; चित्रा वाघ यांचा पत्रातून ठाकरेंना…
-
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना…