एसटीच्या संपाला ठाकरे सरकार कारणीभूत; राधाकृष्ण विखे पाटलांची राज्य सरकारवर टीका

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारच्‍या नाकर्त्‍या भूमिकेमुळेच एसटी महामंडळाच्‍या कर्मचा-यांचे आंदोलन चिघळले आहे, सरकारमध्‍ये निर्णय करण्‍याचे कोणतेही धाडस नाही. कर्मचा-यांच्‍या संपला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून, सरकार आपल्‍या कर्तव्‍यापासून पळ काढत असल्‍याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

काल रात्रीपासून एस.टी महामंडळाच्‍या कर्मचा-यांनी पुन्‍हा संपावर जाण्‍याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्‍या या आंदोलनाबाबत सरकारकडून कोणताही मार्ग काढला गेला नाही. यामुळे ऐन दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमिवर राज्‍यातील जनतेचे झालेले हाल लक्षात घेता आ.विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्‍या नियोजनशुन्‍य कारभारावर माध्‍यमांशी बोलताना टिका केली.

सरकार चालवितांना निर्णय करण्‍याचे धाडस दाखवावे लागते, दुर्देवाने महाविकास आघाडी सरकारमध्‍ये तसे होताना दिसत नाही. कर्मचारी संघटनांशी सरकारने यापुर्वीच संवाद साधून आंदोलनाबाबत मार्ग काढण्‍याची नितांत गरज होती. परंतू सरकारचा संवाद हा फक्‍त फेसबूकवर राहीला असल्‍याचा टोला लगावून आ.विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वीही कर्मचा-यांची आंदोलन झाली त्‍यावेळी सरकार आणि संबधित मंत्र्यांनी योग्‍यतो समन्‍वय ठेवून त्‍यामध्‍ये मार्ग काढले.

यापूर्वी राज्‍यात देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखालील युती सरकारमध्‍ये शिवसेनेचे दिवाकर रावते हेच परिवहन मंत्री होते मात्र त्‍याकाळात कर्मचा-यांना असे आंदोलन करावे लागले नाही. मग आत्‍ताही महाविकास आघाडी सरकारमध्‍ये शिवसेनेकडेच परिवहन खाते आहे, मग नेमकी परिस्थिती आत्‍ताच का ओढावली असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!