मोठी बातमी: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

सांगली: भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी सायंकाळी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सध्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.

याबाबत विचारणा केली असता, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली, तसेच आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलेले राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून आमदार पडळकर यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह गणेश भुते या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!