‘‘औरंगाबादकरांनो लसीचा पहिला डोस घेतला नसेल तर आता पेट्रोल, डिझेल मिळणार नाही”

औरंगाबाद: देशातील करोना नियंत्रणासाठी लसीकरण सर्वात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. पंरतु, आजही काही लोक लस घेण्यासाठी समोर येत नाहीत. यावरच आता औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लशीचा पहिला डोस घेतला नसेल तर औरंगाबादकरांना आता पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने करोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आदेशाची अंमलबजावणी 10 नोव्हेंबर पासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून राज्यामध्ये लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा हा 26 व्या क्रमांकावर गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी पूर्ण देशाचं लसीकरण व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे लसीकरण अभियानात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत.

पेट्रोल पंपधारक ,गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार ,कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सुविधा हव्या असतील तर कोरोना लसींचा पहिला डोस घेणं बंधनकारक आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!