राज्यात सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता.

यापूर्वीसारखेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीने कॉलेजेसमध्ये शिक्षण सुरू राहील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विजेची उपलब्धतता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनी घेणे गरजेचे आहे. तसेच एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येणे किंवा विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या कारणामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनीही घेणे गरजेचे आहे असेही उदय सामंत म्हणाले.

ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली असून अकृषी तसेच खाजगी विद्यापिठांमध्ये या नियमावलीचे पालन केले गेले पाहिजे असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. कोंडवाना विद्यापीठ, जळगाव आणि नांदेड विद्यापीठ तीन ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्याने त्याठिकाणी परीक्षा ऑफलाईन होतील. त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घ्यायच्या आहे. इतर विद्यापिठांच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचे मान्य केल्याने या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतो आहोत हा निर्णय जाहीर करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा असे उदय सामंत यांनी सांगितले.