नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA मार्फत चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची एनआयए(NIA)कडून चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज चंद्रकांत पाटलांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली.
दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बोर्नव्हिटा पिण्याची गरज आहे. असा टोला संजय राऊत आणि नवाब मालिक यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
नवाब मलिक यांनी स्वतःहूनच मान्य केलं आहे की ज्या आरोपींना टाडा लागणार होता त्यांच्याकडून जमीन कवडीमोल दराने खरेदी केली आहे. टाडामध्ये ज्या आरोपींची जमीन जप्त होणार होती ती जमीन नवाब मलिकांनी घेतली आहे. नवाब मलिकांनी हा देशद्रोह केला आहे. ओरा कमिशनचा रिपोर्ट समोर आणा त्यातून समजू शकेल काय काय घडलं आहे? टॉपचा नेताच जर दाऊदशी संबंधित आहे तर बिचारे मलिक तरी काय करणार? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
कुणासोबत फोटो काढलेले दाखवत असतील तर त्यात काय विशेष तुमचेही फोटो अनेकांसोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावरून फडणवीसांनी सरळ अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.