आमच्याकडे तक्रारदार गायब आहेत, तरीही प्रकरण सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

5

औरंगाबाद: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या बेपत्ता आहेत. परमबीर सिंह परदेशात फरार झाल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांचं नाव न घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. ‘आमच्याकडे तक्रारदार गायब आहेत, तरीही प्रकरण सुरू आहे’, असं म्हणत ठाकरे यांनी टोला लगावला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

न्यायदानाच्या प्रक्रियेत तारीख पे तारीख असा सर्वसामान्यांचा अनुभव असतो. न्यायदान प्रक्रियेत विलंब होत असल्याचे आपण पाहिले आहेत. पण या न्यायदानाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य पिचला जातोय. पण न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सरकार म्हणून काय करता येईल ? यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही न्यायदानाची प्रक्रिया गतिमान होईल हे वचन देतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज म्हणाले.

अनेकदा कोर्टात जाऊन आयुष्य निघून जाते. पण अनेक प्रकरणात तक्रारदार गायब आहेत, तरीही केसेस सुरू आहेत, असेही पहायला मिळत आहे. फक्त आरोप केलेत आणि खोदत रहा, असेही अनेकदा अनुभवायला मिळते असे सांगत त्यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला. तक्रारदार गायब आहेत, पण आरोप केलेत म्हणून खणून काढायचे हेच सुरू आहे. त्यामुळेच चौकशा आणि धाडसत्र सुरू आहे. परमबीर सिंह यांचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यावर टीका केली.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.