राज्यात होणारे हल्ले महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्याने – नितेश राणे
मुंबई: राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत का? राज्यातील दंगली हा रझा अकादमीने घडवून आणलेला सुनियोजित कट आहे, असं सांगतानाच राज्यात दंगली भडकावण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात महाविकास आघाडीचाच हात आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. राज्यात दंगली झाल्या. त्याला रझा अकादमीच जबाबदार असल्याचं उघड झालं आहे. तरीही रझा अकादमीच्या एकाही माणसाला अटक होत नाही. सर्व मर्दानगी आमच्यावर का दाखवली जाते? हिंमत असेल तर रझा अकादमीच्या अध्यक्षांना अटक करून दाखवा, असं आव्हानच राणे यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.
राज्यात एवढी मोठी दंगल होते. हे महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सचं फेल्युअर नाही का? असा सवाल करतानाच आमचा सरकारवर विश्वास नाही. येणाऱ्या काळात आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि एनआयएशी याबाबत चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक घाणेरडं राजकारण सुरू आहे. चुकीचं नरेशन सेट केलं जात आहे. राज्याचे गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांची विधाने पाहा. हिंदू संघटनांमुळेच मोर्चे निघाला आणि त्यातून दंगल झाल्याचं चित्रं उभं केलं जात आहे. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपमुळे दंगल झाल्याचं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. आता 13 नोव्हेंबरच्या आधी काय घडलं हे सांगायला लागेल. 12 नोव्हेंबरला नांदेडमध्ये मोर्चा निघाला. हा केवळ मोर्चा नव्हता. तो सुनियोजित मोर्चा होता. त्याचे आधीच सगळीकडे पोस्टर लागले होते, असा दावा राणे यांनी केला.