माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या चष्म्याचा नंबर तपासला पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. यावर माझी दृष्टी तपासण्यासाठी माझं नेतृत्व आणि संघ समर्थ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी महाराष्ट्रातील जनतेकडून माहिती घ्यावी की राज्यातील महाविकास सरकार उत्तम चाललं आहे का नाही? मुख्यमंत्री आजारी आहेत त्यामुळे त्यांच्या जागी कोणालातरी जबाबदारी द्यावी अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझी दृष्टी चेक करायला माझे नेतृत्व समर्थ आहे. ज्या संघापासून प्रेरणा घेऊन सामाजिक काम राजकीय काम करतो त्या संघाकडे तर उत्तम व्यवस्था आहे. आमचा कान पकडण्याची आम्हाला दुरुस्त करण्याची व्यवस्था असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊत नशीबाने लाईमलाईटमध्ये आले आहेत. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आले असा त्यांचा दावा आहे. त्यांनी माझी काही काळजी करु नये. महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही याचा प्रामाणिक सर्व्हे १० हजार लोकांचा एखाद्या जिल्ह्यात घ्यावा मग त्यांना समजेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. गेल्या ७० दिवसांपासून मुख्यमंत्री कोणाला भेटले नाही, शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाही म्हणजे महाराष्ट्रात कारभार सुरळीत चालला असेल तर ठिक आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.