यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वड्डेटीवार यांची मोदींवर टीका
मुंबई: शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मात्र यावरून राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याच्याबद्दल आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याबरोबरच आपल्यामुळेच सहाशे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले जाणार तर नाहीत ना? तेव्हा या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हा फंडा तर नाही ना? असा सवाल करतानाच निवडणुकीआधी महागाई कमी करायचे काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिले त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही असं वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.