अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर

नाशिक येथेल ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला  दि. ०३ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक आज संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी जाहीर केले. संमेलनाचा उदघाटन सोहळा दि. ०३ डिसेंबर ला सायंकाळी 4:30 वाजता सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उदघाटक विश्वास पाटील असणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर आणि मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित असतील. जावेद अख्तरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरदेखील या संमेलनाला सहभागी होणार असल्याची माहिती जातेगावकर यांनी दिली.

संमेलनात तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद, चित्र, शिल्प प्रदर्शन, बालकुमार साहित्य मेळावा, गझल मंच, कथाकथन, ग्रंथ प्रदर्शन यांसह अनेक कार्यक्रम या संमेलनात होणार आहे. संमेलनाचा समारोपाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टकले करणार आहेत.