पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण कुठे करणार?; सामानाच्या अग्रलेखातून मोदींना सवाल
मुंबई: संविधान दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम बराच चर्चेत राहिला. विरोधकांनी बहिष्कार टाकलेल्या या कार्यक्रमात मोदींनी नाव न घेतला राजकीय घराणेशाहीवर निशाणा साधला. ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदींनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेनं प्रत्युतर दिलं आहे. ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे’, असं शिवसेनेनं मोदींना सवालही केला आहे.
मोदींनी संविधान दिनी सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या भाषणावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. “संविधान दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे महनीय विचार प्रकट केले आहेत. त्यात शुद्ध विचार किती व राजकीय विरोधकांवर हल्ले किती ते पाहावे लागेल.
शुक्रवारी देशात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी ‘नाव’ न घेता काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणतात, ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक आहे. संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले. आता देशहित मागे पडले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामनाच्या संपादकीयमध्ये भाजप हा फॅमिली पार्टी नसल्याचं सांगण्यात आलंय पण एका गटाची तिथं कशी हुकूशाही आहे यावर मात्र भर देण्यात आलाय. संपादक म्हणतात- भाजप ही फॅमिली पार्टी नाही. पण गेल्या काही वर्षात तेथे एका गटाची हुकूमशाही आहे. श्री मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातच्याच नेत्याला पक्षाचे अध्यक्ष केले. सत्ता व पक्षाची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे. घराणेशाही व पक्षांतर्गत एककल्ली, हुकूमशाही कारभार यात तसे साम्य आहे. संपादकीयमध्ये पुढं असं लिहिलंय- आज नोटबंदी, चीनची घुसखोरी हे प्रकार देशाच्या मुळावर आले तरी भाजपात ब्र काढण्याची हिंमत नाही. ही स्थिती फॅमिली पार्टीपेक्षा भयंकर आहे.