मोराच्या ४ पिल्लांचा कृत्रिम जन्म; पुण्यात देशातील पहिला यशस्वी प्रयोग

पुणे: पुरंदर येथील अंडी उबवण केंद्रात देशातील पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला. इला फाऊंडेशनने राष्ट्रीय पक्षी मोराच्या ४ पिल्लांना कृत्रिम जन्म दिला. एका शेतकऱ्याला शेताच्या बांधावर लांडोरीची ४ अंडी सापडली होती. त्याने ती अंडी इला फाऊंडेशनकडे दिली. नंतर या फाउंडेशनने उबवण पेटी आणून त्यात ही अंडी ठेवली होती. त्यातून ४ गुटगुटीत मोराची पिल्ले जन्माला आली आहेत. देशातील ही पहिलीच घटना आहे, असा दावा या फाउंडेशनने केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगळी गावातील शेतकरी सुरेश शिंदे यांना बांधावर लांडोरीची ४ अंडी सापडली होती. ती त्यांनी पिंगोरीतील इला फाऊंडेशनला दिली. त्यानंतर इला फाउंडेशनने उबवण पेटी आणून त्यात ही अंडी ठेवली. काही दिवसांनी या अंड्यांमधून मोराची ४ पिल्ले बाहेर आली. माणसाने हात लावला तर लांडोर अंडी संभाळत नाही. ती अंडी नष्ट करते, असे असताना महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीने पिंगोरी गावात इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये अंडी उबवण पेटी ठेवून मोराच्या या ४ पिलांना कृत्रिमरित्या जन्म दिला. आता या पिलांचे संगोपन ही संस्था करणार आहे. अशा प्रकारे देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.

याबाबत बोलताना डॉ. सतीश पांडे म्हणाले की, मोराची अंडी कुठे पडलेली आढळल्यास दया म्हणून काही वेळा लोकांकडून ती अंडी कोंबडीच्या माध्यमातून उबवण्याचा प्रयत्न केला जातो. मोराची अंडी आकाराने मोठी असतात. त्यामुळे ती अंडी कोंबडीकडून योग्य रीतीने उबवली जात नाहीत, कोंबडी ती अंडी अर्धवट सोडून देते आणि ती अंडी वाया जातात. या इन्क्युबेटर आता मोराची अंडी उबवणे सहज शक्य होणार आहे.