हॉकी महाराष्ट्र संघटनेकडून हॉकी इंडिया संघटनेची मोठी फसवणूक

5

पिंपरी: हॉकी महाराष्ट्र या राज्यातील क्रीडा संघटनेने केंद्रीय संघटना हॉकी इंडियाची दिशाभूल करून स्वहितासाठी खुलेआम फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेतील संबंधित व्यक्तींनी वरिष्ठ हॉकी खेळाडूंसाठी रविवार ७ नोव्हेंबर ते गुरुवार ११ नोव्हेंबर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर येथे ५ दिवसीय स्पर्धेचे आयोजन करत प्रत्येकी ५०० रुपये रजिस्ट्रेशन फी आणि प्रत्येक जिल्ह्यातील संघाकडून ३ हजार रूपये आकारून जवळपास २ लाखांची फसवणूक केल्याचे स्पष्टआहे. तसेच स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची राहण्याची आणि खाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले.

सध्या केंद्र आणि राज्य सरकारचे कोरोना महामारीच्या उपाय योजने बाबत स्पष्ट निर्देश असताना देखील संघटनेने या खेळाडूंना कोरोना संसर्गापासून बाचावसाठी कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतलेली दिसून आली नाही. हॉकी महाराष्ट्र संघटनेने प्रत्येक खेळाडूंकडून प्रत्येकी ५०० रुपये तसेच जिल्हा संघाकडून प्रत्येकी ३ हजर रुपये आकारणी करून देखील त्यांना मास्क किंवा सॅनीटायझर दिले नव्हते.

या निष्काळजी पणामुळे  राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यातून आलेल्या वरिष्ठ खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळाली. खर तर हॉकी इंडियाने घालून दिलेल्या  “वन स्टेट वन बॉडी”  या नियमान्वये हॉकी महाराष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील ३८ जिल्यातील संघांना आमंत्रित करून ही स्पर्धा आयोजित करायला हवी होती.

मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून हॉकी इंडिया संघटनेची हॉकी महाराष्ट्र संघटनेने तस काहीही न करता फसवणूक केली. उलटपक्षी  नियोजन शून्य आयोजनामुळे नाइलाजाने राज्यभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना मंदिर, धर्मशाळा आणि एसटी स्टॅण्ड या ठिकाणी थंडी वाऱ्यात रात्र काढावी लागली. काही जिल्ह्यातील खेळाडूंना हॉकी खेळाच्या प्रेमापाई तर उपाशी पोटी देखील झोपावे लागले हे राष्ट्रीय खेळ “हॉकी”  असलेल्या भारत देशाचे दुर्दैव आहे.

तसेच आपण किती काटेकोरपणे स्पर्धा भरवतो हे केंद्रीय संघटनेच्या हॉकी इंडियाला फक्त दाखवण्यासाठी चक्क पुणे संघातील काही खेळाडूंना हॉकी महाराष्ट्र संघटनेने हॉकी उस्मानाबाद संघातुन खेळाडूंची कोणतीही चौकशी न करता नियमबाह्य पद्धतीने खेळवले. ज्यामध्ये आयकर विभागात कर्मचारी असलेल्या एका खेळाडूला खेळवण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्हा हॉकी संघटनांचे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी नसतानाही त्यां संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

हॉकी महाराष्ट्र ही संघटना अश्या अनेक कारणांमुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी वारंवार मनमानी कारभार करतात हे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे. तसेच या सर्व गोष्टी खुलेआम सुरू असून देखील त्याच्यावर संबंधित क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत ? तसेच त्यांच्या विरुद्ध सक्षम पुरावे असून सुद्धा त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो.  त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे हे देखिल स्पष्ट आहे.

आता हॉकी इंडिया संघटना ही हॉकी महाराष्ट्र या संघटनेच्या आयोजक पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या स्पर्धा आयोजकांनी खेळाडूंचे हाल करून, नियमबाह्य पद्धतीने स्पर्धेचे आयोजन केल्या प्रकरणी त्यांची कायदेशीर चौकशी होऊन त्यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे.

हॉकी महाराष्ट्रावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांचे ताशेरे

ऑक्टोबर महिन्यात नरिंदर बात्रा हे पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी हॉकी महाराष्ट्र या संघटनेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले, “पूर्वी भारतीय हॉकी संघात महाराष्ट्राचे ३ ते ४ खेळाडू असायचे. आतातर शिबिरातही महाराष्ट्राचे खेळाडू दिसत नाहीत. या बाबत हॉकी महाराष्ट्रने मला निराश केले आहे. हॉकी महाराष्ट्रने बोलण्यावर भर देण्यापेक्षा कामावर भर दिला तर हॉकीसाठी फायद्याचे ठरेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.