पवारांनी 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजलं; संजय राऊतांचा भाजपला टोला
मुंबई: भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणाले.
आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आलो की फोडू. मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी सांगीतलं भाजपला ऐक्य नको आहे. आम्हाला ते 2 वर्षांपूर्वी समजले. देश किती मागे चाललाय हे आम्हाला आता कळू लागलं आहे. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं.