करीना कपूर खान आणि अमृता अरोरा करोना पॉझिटिव्ह, अनेक पार्ट्यांना लावली होती हजेरी

मुंबई: देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान आणि अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

दोन दिवसांपूर्वी करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती. दरम्यान, यानंतर आता करीना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मुंबई महापालिकेकडून करीना आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची RTPCT चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ANI वृत्तसंस्थेने देखील करीना कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

करीना आणि अमृता या अगदी खास मैत्रिणी आहेत आणि दोन्ही अभिनेत्रींमध्ये नेहमीच चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते. दोघीही एकत्र क्वालिटी टाइम घालवताना त्यांचे अनेक फोटो शेअर करत असतात. नुकतंच दोघीही करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. तसेच, या दोन्ही अभिनेत्रींनी याआधीही कोरोना नियमांचे उल्लंघन करून अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री सुपर स्प्रेडर असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. मात्र, या दोन्ही अभिनेत्रींकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

करीना-अमृतापूर्वी काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने तिच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. याशिवाय साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार कमल हसन यांनीही त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती.