आणखी एक धक्का..! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

4

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना बुधवारी सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.

कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. न्यूयॉर्कमध्ये वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’, ’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.