एमपीएससी आयोगाचा संतापजनक कारभार: आयुष्याची लढाई हरलेला स्वप्नील ‘एमपीएससी’च्या यादीत!

36

पुणे: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. 29 जून रोजी स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेला आता 6 महिने उलटल्यानंतर एमपीएससीच्या कारभाराचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत आता स्वप्नीलचं नाव आलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचं नाव आलं आहे. या प्रकारामुळे स्वप्नीलचे कुटुंबीय आणि एमपीएससी विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्ती केला जातोय.

‘माझ्याकडे एमपीएससी आयोगाचं माझ्याकडे पत्र आहे. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची माहिती असतानाही एमपीएससी मुलाखतीसाठी तारीख जाहीर करत आहे. याचा अर्थ तो कच्चा नव्हता, तो हुशार होता. एक हजार एक टक्का एमपीएससीने माझ्या मुलाचा बळी घेतला आहे. इतकंच नाही तर एमपीएससी आमच्या लोणकर कुटुंबियांच्या जमखेवर मिठ चोळण्याचं काम करत आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या वडिलांनी एकामराठी वृत्तवाहिनीशी व्यक्त केली आहे.

मन हेलावून टाकणारं पत्र

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत राज्य सरकारच्या चालढकल धोरणावर सुसाईट नोटमध्ये बोट ठेवलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.