ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक; राज्यात आज 106 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान

मुंबई: राज्यात आज 106 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. काल सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे.

मंडणगड, दापोली (रत्नागिरी),  कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ ( सिंधुदुर्ग ), देहू (पुणे-नवनिर्मित नगरपंचायत), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी ( सातारा ), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), तर, सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित नगरपंचायत), वैराग (नवनिर्मित नगरपंचायत), नातेपुते (नवनिर्मित नगरपंचायत)  या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष आहे.

भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगर पंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 जागासाठी पंचायत समितीच्या 79 जागा तर नगर पंचायतीच्या 39 जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 43 जागा नगर पंचायतीच्या 86 जागा तर पंचायत समितीच्या 45 जागासाठी हे मतदान होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पोंभुर्णा – एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना16 आणि राष्ट्रवादी15 जागा लढवत आहे. येथे   भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला.