मलिकांचा हल्लाबोल; वानेखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांकडून लॉबिंग- नवाब मलिक
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीतील पदाचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपला आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपलेला असताना त्यांना रिलिव्ह का केले गेले नाही ? तसेच मुदतवाढीबाबतही काहीच माहिती का दिली नाही ? त्यांच्या मुदतवाढीसाठी केंद्रात लॉबिंग सुरू आहे.
समीर वानखेडे हे विभागीय संचालक पदावर कायम रहावेत यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांकडून गृहमंत्रालयात जोर लावला जात आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. समीर वानखेडे यांच्या मुदतवाढीचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण त्यांनी नेमलेल्या पीआर एजन्सीच्या माध्यमातून मात्र बातम्या पेरल्या जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
समीर वानखेडे यांच्या एनसीबीतील कार्यकाळाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर होता. पण त्यांच्या मुदतवाढीच्या बाबतीत किंवा रिलिव्हच्या बाबतीत कोणताच निर्णय का झाला नाही ? या गोष्टीकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधले. पीआर एजन्सीच्या माध्यमातून समीर वानखेडे हे खोट्या बातम्या पेरत आहेत. समीर वानखेडे हे तीन महिन्यांच्या रजेवर जाणार आहेत, हीदेखील बातमी त्यांनी पीआर एजन्सीच्या माध्यमातून पेरली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मला एक्स्टेंशन नकोय अशा बातम्याही समीर वानखेडे यांनी पीआर एजन्सीच्या माध्यमातून पेरल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला.
मी जेव्हा समीर वानखेडेंविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात मानहानीचा दावा केला. पण कोर्टात बाजू मांडताना एनसीबी किंवा केंद्रीय यंत्रणांबाबत आवाज उचलण्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. मी तपास यंत्रणांच्या गैर कारभारावर बोलतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डीजी एनसीबीवर काय कारवाई करणार ? समीर वानखेडेवर कारवाई करणार का ? असाही सवाल त्यांनी केला.