अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका केलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. कोल्हे हे लोकप्रितिनिधी आहेत, त्यांनी गोडसेंना हिरो बनवण्याचे काम करु नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटावरुन राज्यात वाद सुरू झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विरोध दर्शवल्यानंतर, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘अमोल कोल्हेंनी ती भूमिका पक्षामध्ये प्रवेश करण्याआधी साकारली असून एक कलाकार म्हणून माझा अमोल कोल्हेंना पाठिंबा आहे’ असे म्हटले आहे.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.