महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल – देवेंद्र फडणवीस
मुंबई: संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.
मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. pic.twitter.com/Sf4QcAIHNn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2022
चंद्रकांत पाटील यांचीही आघाडी सरकारवर टीका
राज्यातील विविध नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकटे एकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. आज १०६ नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत. त्यातील सात ग्रामपंचायतींचे निकाल गुरूवारी लागतील. म्हणजे जवळपास ९९ नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत. त्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष आहे हे सिद्ध झालं आहे. नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपच्या पाठिंब्याने जिंकणं यात देखील भाजप क्रमांक एकवर आहे.
विचाराने, आचाराने एक नसतानाही युती करून भाजपशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या एकत्र लढण्याला देखील नजीकच्या काळात आम्ही पुरून उरू. पण एकटे लढण्यात आम्ही सरस आहोत हे सिद्ध केलं. सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत, ग्रामपंचायत निवडणुकीत, विधान परिषद निवडणुकीतही हेच दिसून आलं आहे. आजही महाराष्ट्राने हेच पाहिलं आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.