मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे जनाधार नसणारं सरकार – जयंत पाटील

23

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्रातील जनमत सरकारच्या बाजूने नाही. अनेक ठिकाणी या नेत्यांच्या सभा होतात त्यावेळी खुर्च्या रिकाम्या असतात आणि नेते मात्र बोलत असतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीच्या सभेचे व्हिडीओ महाराष्ट्रात व्हायरल झाले. मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत. यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोहचायला नको. हे दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे. मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्दयावर येतात. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे असा प्रकार केला आहे. ही नाकर्तेपणाची भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘महानगरी टाइम्स’ चे पत्रकार शशिकांत वारिशे हे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जे जनमत होते त्याची बाजू मांडत होते. मात्र रिफायनरी झाल्यावर त्यातून लाभ मिळणार असल्याने भाजपच्या एका कार्यकर्त्याने चिडून शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडले. या दुर्दैवी घटनेचा जयंतराव पाटील यांनी तीव्र निषेध केला. महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून, पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायचा सत्तारुढ पक्षाचा हा कावा दिसतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमी पाच आठवड्यांचे असते. मात्र आताच्या अधिवेशनात फक्त १७ दिवसांचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांना अधिक चर्चा करता यावी आणि काही गोष्टी विस्तारीतपणे मांडता याव्यात, असा ठराव आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.