राज्यातील एक पिढी बिघडत आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात व्यक्त केली चिंता

15

राज्य कसे सुरु आहे याचा मापदंड हा कायदा आणि सुव्यवस्था मानला जातो. आज राज्यातील नाक्या-नाक्यावर मटके सुरु झाले आहेत. मटक्याचा अड्डा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येईल त्या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. आता ही मटक्याची पद्धत बदलली आहे. खेळांच्या माध्यमातून हा प्रकार सुरु आहे. यातून राज्यातील एक पिढी बिघडत आहे, अशी चिंता माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना व्यक्त केली.

मुंबईत पानवाल्याकडे थंडाई मागितली तर सर्रास कोकेन, एमडी मिळते. या अमली पदार्थांचा मोठा धंदा सुरु आहे. त्यातून नवीन पिढी नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. यासाठी हे सर्व प्रकार थांबवण्याची गरज आहे. जिथे जिथे हे ड्रग्ज विकले जातात त्या भागातील पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. लोकप्रतिनिधींना या सर्व अड्ड्यांची माहिती असते तर पोलिसांना का असू नये हे आश्चर्य आहे, असे ते म्हणाले.
जो महाराष्ट्र समाजसुधारकांसाठी ओळखला जातो, जिथे विधवा विवाहाची सुरुवात झाली, स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली त्याच राज्यात मुलींची हत्या होते. राज्यात शिंदेत-फडणवीस आणि केंद्रात मोदींचे सरकार असताना, सर्व यंत्रणा तुमची असतानाही या राज्यात हिंदू खतरे मे है, हे दाखवले जाते. जर तुमच्या राज्यात हिंदू धोक्यात असेल तर त्या राज्यात तुम्ही राहता कशाला? असा उलटा प्रश्न आव्हाड यांनी केला.
बागेश्वर महाराज संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल बोलून जातो. या महाराष्ट्राच्या मातीला आजही तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गंध आहे. त्यामुळे बागेश्वर महाराजाच्या वक्तव्यावर ज्याचे हृदय पिळवटले नाही तो मराठी माणूस नाही. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली जातात. माजी राज्यपाल आणि अनेक लोक बोलले तरी राज्यातील मराठी माणसाने सहन केले. मात्र मराठी माणूस इतकाही सोशिक नाही की जो प्रत्येक अत्याचार सहन करेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला.
ठाण्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलून नेले. त्याला सोडवण्यासाठी त्याचे वडील पोलिस ठाण्यात गेले तेव्हा हवालदाराने वडिलांच्या कानशिलात लगावली आणि त्यांनी जीव सोडला. हे कुटुंब बौद्ध समाजाचे आहे, त्यामुळे त्यांचा बोलण्याचा अधिकार हिरावण्याचे काम होत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
मराठी माणसाच्या मनाला हे सरकार किती चिमटा काढणार हे सांगताना आव्हाड यांनी बेस्टवरील कर्नाटक राज्य सरकारची जाहिरात सभागृहात दाखवली. एकीकडे कर्नाटक राज्यात मराठी माणसांना आरोग्य सेवा देऊ नका, असे हुकूमशाही आदेश त्या राज्याचे मुख्यमंत्री देतात. त्या कर्नाटक सरकारची जाहिरातबाजी मुंबईतील बेस्ट बसवर लावण्याची परवानगी दिली जाते. मराठी माणूस कर्नाटकमध्ये अत्याचार सहन करतोय तरी कर्नाटक बघूया ही जाहिरात बेस्टवर लावली जाते, अशी टीका आव्हाड यांनी केली. कर्नाटकऐवजी मुंबईला मोठा इतिहास आहे, ती मुंबई दाखवा. त्यामुळे अशी जाहिरात लावून कर्नाटकचा उदो उदो करणारे सरकार जनतेला चालणार नाही, असे स्पष्ट मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.