पार्किंगचा प्रश्न सुटणार.! कर्वे रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांना दिलासा, चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
पुणे : वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली जात होती. सदर मागणीच्या अनुषंगाने आज पुण्याचे पालकमंत्री कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन आणि शहर वाहतूक विभागाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी पाटील यांनी कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वे मध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश पालिका आयुक्त आणि शहर वाहतूक आयुक्तांना दिले. गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. यामुळे कर्वे रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी मोठा दिलासा मिळाला आहे.

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरपुडे उपस्थित होते.